महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …

पुराणांमधे प्रत्येक देवतेची काही व्रते सांगितली आहेत. सोप्या शब्दात व्रत या शब्दाचा अर्थ आहे धार्मिक नियम. आजकाल स्वतःला आधुनीक विचारसरणीचे म्हणवणारे काही जणं व्रतं-वैकल्यांची टिंगल वा उपहास करताना आढळतात कारण त्यांना त्यामागील योगशास्त्रीय भुमिकाच समजलेली नसते. आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी.
व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत.
व्रते मनाला आणि शरीराला शिस्त लावतात :
माणसाचे मन हे स्वैर वागण्यात जास्त आनंद मानते. पण हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत असेल तर ठीक नाहीतर हेच स्वातंत्र्य स्वैराचार बनते आणि आपल्या अध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरते. व्रतांचे पालन केल्याने आपल्या मनाला वेसन घालण्याचे शिक्षण मिळते आणि मग योग, अध्यात्म हे जाचक वाटत नाही. 
व्रतांमुळे पूजा अर्चा , आरत्या , जप, स्तोत्र पाठ इ मुळे माणसाच्या श्रद्धेत आणि भक्तीत वाढ होते. व्रतामुळे माणसाच्या इच्छाशक्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. 
व्रतांमध्ये करण्यात येणारा उपवास हा निसर्गोपचार आणि आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा मनाला गेला आहे. उपवासाने पचन संस्थेला आराम मिळतो. आणि शरीरातील दुषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. पण उपवासाच्या नावावर एकादशी दुप्पट खाशी ! मात्र काही उपयोगी ठरत नाही. 
श्रीशंकराची काही लोकप्रिय व्रते म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत, सोमवार व्रत आणि प्रदोष व्रत.
महाशिवरात्रीचे व्रत : 
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. या दिवशी सर्व शिवभक्‍त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.
महाशिवरात्र’ हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.

‘शिव’ म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला ‘नीलकंठ’ म्हणूनही संबो‍धले जाते. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो.

महाशिवरात्री’ म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्‍वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्‍वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्‍त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्‍ती करावी.

शिवपूजेची वैशिष्ट्ये
१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढर्‍या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व
महाशिवरात्रीला विश्‍वात वाढणार्‍या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

Main Menu